अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक दुकानदार, व्यापारी हे चाचणी न करता, शासकीय आदेशाचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यामुळे मंगळवार, दि.१६ मार्च रोजी शहरातील दोन दुकाने सील करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत, तसेच कोरोना चाचणी करूनच दुकाने उघडावे, असे धोरण ठरले आहे. मात्र, वेळ संपल्यानंतर कांगरपुरा प्रभाग क्र. ५ व मोठे बारगण प्रभाग क्र. ४ येथे कोरोना चाचणी न केलेल्या २ किराणा दुकानाला सील लावण्यात आले. उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात तीन पथके गठीत करून, शहरातील कोरोना रुग्णांच्या घरी भेटी देऊन नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. त्याचप्रमाणे, संपर्कातील व्यक्तींना चाचणी करीता पाठविण्यात आले. दुकाने सील करण्याची कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नीलेश मडके, मंडळ अधिकारी एम.एन. अढाऊ, पटवारी दिनेश मोहोकार, आरोग्य निरीक्षक चंदन चंडालीया, संदीप मोगरे पोलीस शिपाई आठवले यांनी केली. शहरातील व्यापारी व दुकानदार यांनी कोरोना तपासणी करूनच व्यवहार करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले. शहरात जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, नायब तहसीलदार हरीश गुरव, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ठाणेदार ज्ञानोबा फड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष तोरणेकर आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. (फोटो)