- ब्रम्हानंद जाधव
बुलाडणा: आवर्षण सदृश स्थिती पाहता राज्यात रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांना कामे मिळण्यात सुलभता निर्माण झाली आहे. राज्यात रोजगार हमी योजनेची ३२ हजार ८३९ कामे सुरू असून या कामांवर १ लाख ७८ हजार ३८५ मजुरांची भीस्त आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मंजुरांच्या कमाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शेतातील खरीप हंगामाची कामे आटोपली असून रब्बीच्या कामाला सुरूवात करण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. सिंचनाअभावी अनेक शेतकरी रब्बी हंगामाची कामे यावर्षी करू शकत नाहीत. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे आवघड झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मंजुरांना कामाची आवश्यता आहे. त्यासाठी राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनंतर्गतची विविध छोटी-मोठी कामे वाढविण्यात आली आहेत. रोहयोच्या या कामांचा मोठा आधार मजूरांना होत आहे. सध्या राज्यात ३२ हजार ८३९ कामे सुरू आहेत. त्यावर दिवसाला १ लाख ७८ हजार ३८५ मंजूरांची हजेरी लागत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देण्यात येते. तसेच १०० दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरविण्यात येत आहे. प्रति कुटुंब १०० दिवसावरील प्रत्येक मजुराच्या, मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये मजुरांना या कामामुळे दिलासा मिळत आहे.
मजूरांमध्ये वाढ होण्याची शक्यतागतवर्षीच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र आहे, गेल्या वर्षी राज्यात रोजगार हमी योजने अंतर्गत १५ लाख ४९ हजार कुटूंबाना रोजगार उपलब्ध केल्या गेला होता. मात्र यंदा या आकड्यात वाढ होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. २०१६-१७ यावर्षी १४ लाख ३३ हजार व २०१५-१६ मध्ये १२ लाख ७५ हजार कुटुंबाना रोजगार पुरविण्यात आला होता. यामध्ये सुध्दा प्रत्येक वर्षी वाढ होत असल्याचे दिसून येते.
कामांचा खर्च कोटींच्या घरातरोजगार हमी योजनेच्या कामावर करण्यात आलेला खर्च कोटींच्या घरात जात आहे. २०१७-१८ मध्ये सुमारे १९ कोटी ८ लाख ६९ हजार रुपये एकूण खर्च करण्यात आला होता. त्यातुलनेत यावर्षी दुष्काळाचे सावट वाढल्याने रोहयोच्या कामावरील खर्च वाढण्याची शक्यता आहे.