मूर्तिजापूर (अकोला) : येथील रेल्वेस्थानकावर दोन अज्ञात महिलांनी मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ आॅक्टोबर रोजी रात्री ११.४० वाजताच्या दरम्यान घडली.रेल्वेस्थानकावर ५० वर्षे व २५ वर्ष वयोगटातील दोन महिला रात्री ९ वाजताच्या सुमारास दाखल झाल्या. दरम्यान, त्यांनी तेथे असलेल्या नळावर पाणी पिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रात्री ९ वाजतापासूनच रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या झाडाखाली अंधारात त्या बसलेल्या होत्या. रात्री ११.४० वाजता दोघींनीही नागपूरकडे जाणाऱ्या मालगाडीखाली अचानक उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही महिलांची अद्यापही ओळख पटली नसून, २५ वर्षीय महिलेने काळी सलवार, लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर ५० वर्षीय महिलेच्या अंगावर केवळ लाल रंगाचा परकर व पिवळ्या रंगाचे ब्लाऊज राहिले होते. घटनेबाबत रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती वंदे मातरम आपत्कालीन पथकाला देण्यात आली होती. पथकाचे संचालक पुंडलिक सगेले, सेनापती शेवतकार, गौतम दिंडोरे, विक्की गावंडे, सागर वांदे, अक्षय सूर्यवशी यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास ठाणेदार किरण कालवे यांच्या मार्गदर्शनखाली रेल्वे पोलीस चौकीचे प्रभारी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जळमकर, पोलीस हवालदार शेख कलीम पंचनामा करून तपास करीत आहे. आत्महत्या केलेल्या महिलांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)