अकोला : सायकली आणि दुचाकी चोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी गजाआड केले. पोलिसांनी चोरांची कसून चौकशी केली असता आरोपीनी गुन्ह्याच्या कबुली दिली असून त्यांच्याकडून चार दुचाकी आणि आठ सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. या चोरट्यांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात वाहनांच्या वाढत्या चोरींच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सर्वच पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना वाहन चोराना पकडण्याचे आदेश दिले आहे. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांना गुप्त माहिती मिळाली की, वाहन चोरीच्या घटनांमध्ये हरिहर पेठ येथील काही युवकांचा समावेश आहे. या माहितीच्या आधारे अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजीद, ऐजाज अहमद, रवि इरचे यांनी सापळा रचत दोन संशयीत युवकाना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आरोपीनी चोरीची कबुली दिली. आरोपीनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी आतापर्यंत चार दुचाकी(किंमत १ लाख ), आठ सायकली (किंमत ३० हजार) असा एकूण १ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची अद्यापही चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून आणखी काही चोरींच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे.