वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे बसस्थानक परिसरात असलेल्या दुचाकी गॅरेजला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवार, दि. १५ मे रोजी सकाळी घडली. या आगीत गॅरेजमधील साहित्य जळून चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
वाडेगाव येथील बसस्थानक परिसरात असलेल्या दुचाकी गॅरेजमधून धूर निघत असल्याचे स्थानिकांना दिसले. यावरून ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी अग्निशमन दलाची वाट न पाहता गावातील सुनील मानकर यांच्याशी संपर्क करीत पाण्याचे टँकर बोलावून घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखत टँकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात ग्रामस्थांना यश आले. यावेळी गॅरेजचे मालक गजानन मानकर यांचे भाऊ मंगेश मानकर हे आगीवर नियंत्रण मिळवित असताना त्यांचा हात भाजला. घटनेची माहिती मिळताच तलाठी एस. ताथोड, कोतवाल नारायण मानकर, नारायण घाटोळ आदींनी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यावर योगेश भटकर, राधेश्याम कळसकर, अरुण चिंचोळकर आदींच्या सह्या आहेत. आगीत दुचाकीचे स्पेअर पार्ट, सीसी कॅमेरा आदी साहित्य जळून ४ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. (फोटो)