लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समाजातील प्रतिष्ठित घरातील मुलगा...राष्ट्रीय कराटेपटू म्हणून त्याने ओळख निर्माण केली; परंतु झटपट पैसे कमाविण्याच्या नादात आपल्या घराची, वडिलांची समाजातील प्रतिष्ठा तो विसरला आणि ऐशोआरामासाठी त्याने मित्राच्या साथीने दुचाकी चोरण्याचा गैरमार्ग अवलंबला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सिव्हिल लाइन पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी रविवारी दोन युवकांना अटक केली. त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी जप्त केली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये श्रेयश सुरेश ठाकरे (२० रा. जवाहर नगर), अक्षय मनोज मसने (१९ रा. मोठी उमरी) यांचा समावेश आहे. श्रेयश हा प्रतिष्ठित घरातील मुलगा असून, तो राष्ट्रीय कराटेपटू आहे. झटपट पैसा कमाविण्याच्या लालसेने श्रेयशला दुचाकीचोर बनविले आणि तो मित्र अक्षयच्या साथीने दुचाकी चोरी करू लागला. पुढे चोरी केलेली दुचाकीची विक्री करायची आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर मौजमस्ती करायची; परंतु श्रेयश व अक्षयने एक दिवस आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकू, याचा विचारही केला नाही. आपण कोणत्या कुटुंबातून आलो, हे तो विसरला आणि गैरमार्गाला लागला. पोलिसांनी श्रेयश ठाकरे व अक्षय मसने यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला. रणपिसे नगरातील उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये राहणारे आकाश नंदकिशोर तायडे यांची एमएच ३० एएक्स २२४४ क्रमांकाची दुचाकी अपार्टमेंटमधून चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी १० जुलै रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर दुचाकी चोरीमध्ये संशयित म्हणून श्रेयश ठाकरे व अक्षय मसने यांची नावे समोर आली. ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघांकडून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेपाळ येथील स्पर्धेत मिळविले पदकश्रेयश ठाकरे हा कराटेपटू असून, त्याने काही महिन्यांपूर्वी नेपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत आपल्या संघाला पदक मिळवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट चावीने करायचे दुचाकी लंपास दुचाकी चोरी करायची आणि नंबरप्लेट बदलून ती काही महिने चालवायची आणि एखादा ग्राहक पाहून २० ते २५ हजार रुपयांमध्ये ती दुचाकी विकायची. कोणालाही संशय येऊ नये म्हणून जवळच्या, ओळखीतील व्यक्तीच्या दुचाकीची बनावट चावी बनवायची आणि दुचाकी चोरायची. अशा पद्धतीने श्रेयस व अक्षय काम करायचे, असेही पोलिसांनी सांगितले.
ऐशोआरामासाठी राष्ट्रीय कराटेपटू बनला दुचाकी चोर !
By admin | Published: July 17, 2017 3:23 AM