अकोला : इंडियन प्रीमियर लीग आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल यांच्या दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची देवाण-घेवाण करणाऱ्या दोघांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीलेश केसरीमल सोनी व अनिल नारायणदास बाजोरिया हे दोघेजण आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार चालवीत असल्याची माहिती शहर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पाळत ठेवून सदर ठिकाणी छापा टाकला. त्यांच्या अड्ड्यावरून टीव्ही, मोबाईलच्या साहाय्याने सट्टा लावण्यासाठीचे यंत्र, एक रिमोट तसेच सहा मोबाईल रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.