अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चतारी येथील रहिवासी एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १० हजार रुपये दंड ठोठावला असून दंडाची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणूण देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.पातूर तालुक्यातील चतारी येथील रहिवासी देवसिंह लक्ष्मन सदार (५०) याने याच परिसरातील रहिवासी एका मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना ६ मार्च २०१४ रोजी घडली होती. या प्रकरणाची तक्रार मुलीने चान्नी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी देवसिंह लक्ष्मन सदार याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ आणि बालकांचे संरक्षण अधिनीयमाच्या कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सादर केले. त्यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी देवसिंह लक्ष्मन सदार याच्याविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला कलम ३५४ अन्वये दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला, दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे तर बालकांचे संरक्षण अधिनीयमाच्या कलम १२ अन्वये दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले आहे. दंडाची १० हजार रुपयांची रक्कम पिडीतेस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. शाम खोटरे यांनी कामकाज पाहीले.