अकोला : एका महिलेला अश्लिल इशारे करून प्रेमपत्र देणाऱ्या आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ४० हजार दंडाची शिक्षाही न्यायलयाने आरोपीस ठोठावल्यानंतर या विरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असता या याचिकेवर सुनावणी करतांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीच्या दोन्ही शिक्षा कायम ठेवल्या आहे.सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनंतर्गत येणाºया एक विवाहिता ३१ आॅक्टोंबर २०११ रोजी घराच्या समोर रात्रीच्या सुमारास घरगुती कामे करत होती. यादरम्यान आरोपी श्रीकृष्णा बाबूलाल टावरी हा विवाहीतेजवळ पाणी पिण्याच्या निमित्ताने आला आणि महिलेस अश्लिल इशारे करत चिठ्ठी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला श्रीकृष्णा बाबूलाल टावरी या आरोपीविरोधात भारतीय दंड वीधानाच्या कलम ३५४, ५०९, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायाधीश ए.बी. रेडकर यांच्या न्यायालयात पाच जणांचे बयाण नोंदविण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तीवादानंतर न्यायालयाने दोषीस दोन वर्षाचा कारावास तसेच ४० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात दोषीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील याचिका दाखल केली. प्रमूख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. झेड. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने दोषीची शिक्षा कायम ठेवली आहे.