मागील दीड वर्षांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य शासनाने काेराेनाची नियमावली शिथिल केली असली तरी नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहून अनेक महिन्यांपासून घरात बंदिस्त असलेले नागरिक सुसाट निघाल्याचे दिसत आहे. काेराेना अद्यापही कायम असल्याची जाणीव असतानादेखील ऐन पावसाळ्यात रस्त्यालगत उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याचे परिणाम समाेर आले आहेत. सर्दी, अंगदुखी, ताप, खाेकला, घशात खवखव आदी व्हायरल फिव्हरची साथ पसरण्यासाेबतच आता टायफाइडचे रुग्ण माेठ्या संख्येने आढळून येत आहेत. टायफाइडपासून वाचण्यासाठी दूषित पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळण्याची गरजेचे आहे.
पाणीपुरी उठली अकाेलेकरांच्या जीवावर
पावसाळ्यात साथराेगांचा फैलाव अधिक तिव्रतेने हाेताे. पाेटदुखी, उलटी हाेणे, छातीत जळजळ यांसह टायफाइडच्या प्रसाराला पाणीपुरी कारणीभूत ठरत आहे. याठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या तिखट पाण्यात विक्रेता अनेकदा हात बुडवताे. हात पुसण्यासाठी मळकट कापडाचा वापर करताे. हीच पाणीपुरी अकाेलेकरांच्या जीवावर उठल्याचे डाॅक्टर सांगतात.
या ठिकाणी खवय्यांची गर्दी
गांधी चाैकातील चाैपाटी, जय हिंद चाैकातील दहिवडा, बागातील देवी मंदिरासमाेर, कारमेल काॅन्व्हेंटलगतचा परिसर, जठारपेठ चाैक, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरचा परिसर, जिल्हा परिषदेची आवारभिंत, सर्वाेपचार रुग्णालयाची आवारभिंत, नेहरु पार्क चाैक, मनपाच्या एलबीटी कार्यालयाची आवारभिंत तसेच संत तुकाराम चाैकात उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी दिसून येते.
दिवसातून किमान तीन-चार वेळा तापात चढउतार हाेऊन पाेट दुखते. हा मुदती ताप आहे. उघड्यावरील चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याऐवजी घरीच नाश्ता किंवा खाद्यपदार्थ तयार करण्याची गरज आहे.
जेणेकरून रुग्णालयात जाण्याची वेळ येणार नाही.
- डाॅ. अस्मिता पाठक, वैद्यकीय आराेग्य अधिकारी मनपा