अकोला : आगामी दोन मार्चपासून संगणक टंकलेखन परीक्षेला सुरुवात होणार आहे, मात्र अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागल्याने सर्वच संगणक टंकलेखन इन्स्टिट्यूट बंद आहेत. परिणामी परीक्षार्थींचा सराव बंद झाला असून, त्याचा प्रभाव परीक्षार्थींच्या गती व अचुकतेवर होत आहे. शासकीय किंवा खासगी नोकरीमध्ये टंकलेखन हा भाग अत्यावशक आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक जण कौशल्यावर आधारित संगणक टंकलेखनाचा अभ्यास करतात. पाच ते सहा महिने नियमित केलेल्या सरावानंतर टंकलेखनाची गती व अचुकता वाढते. यामध्ये खंड पडल्यास गती व अचुकता प्रभावित होते. त्यामुळे परीक्षार्थी खंड न पाळता नियमित टंकलेखनाचा सराव करतात. २ मार्च रोजी टंकलेखनाची परीक्षा होणार आहे. परीक्षेला कमी कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांकडून सरावाला जास्त वेळ देण्यात येतो, मात्र यंदा ऐन परीक्षेपूर्वीच लॉकडाऊनमुळे टंकलेखन इन्स्टिट्यूट बंद आहेत. त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
संगणक टंकलेखनाच्या परीक्षा पाहता, या विद्यार्थ्यांसाठी संगणक टंकलेखन इन्स्टिट्यूट सुरू ठेवण्याच्या मागणीचे महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन, संगणक टंकलेखन आदी शासनमान्य संस्थांच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.