राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील अंबाशी शिवारात दरवर्षीच उडदाचा पेरा कमी असतो. यंदाही मोजक्याच शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे. सद्यस्थितीत शेतात पीक बहरलेले आहे, परंतु उडदाला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. लागवडीचा खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अंबाशी शिवारातील जवळपास ५० एकर क्षेत्रावरील असेच चित्र आहे. या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पातूर तालुक्यातील अंबाशी येथील संजय समाधान सोनोने यांनी गट नं. ६२/७ मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी केली होती. त्यांनी कृषी सेवा केंद्रातील पॅकिंगचे बियाण्याची पेरणी केली. आता शेतात उडदाचे पीक वाढले आहे; मात्र उडदाला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. संबंधित कंपनी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेताची पाहणी करून पंचनामा करावा, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कृषी अधिकऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
---------------
मी अडीच एक्कर क्षेत्रात उडीद पिकाची लागवड केली. शेतात पाहणीसाठी गेलो असता उडीद पिकाची वाढ होऊनही शेंगा लागल्या नाहीत. वरिष्ठांनी लक्ष देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई घ्यावी.
-संजय समाधान सोनोने
शेतकरी, अंबाशी, ता. पातूर.
---------------------------------------
शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. शेतात पाहणी व पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येईल.
- धंनजय शेटे, कृषी अधिकारी, पातूर.
---------------------
नया अंदुरा परिसरात मुगाचे उत्पादन घटले; एकरी २० किलो उत्पादन
अमोल साबळे
नया अंदुरा : उन्हाचा फटका आणि सतत ढगाळ वातावरणामुळे मूग पिकांवर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मुगाचे उत्पादन घटले आहे. वन्य प्राण्यांनी मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नया अंदुरा, निंबा, कारंजा रमजानपूर, बहादुरा, अंदुरा, हाता, कवठा, लोहारा, मोखा, जानोरी, निंबा फाटा शेतशिवारातील २० किलो मुगाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे लागलेला खर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत.
अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव शेंगा भरल्याच नाहीत. सतत ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसला आहे. नया अंदुरा, निंबा, कारंजा रमजानपुर, अंदुरा, हाता, मोखा, जानोरी, कवठा, बहादुरा, लोहारा, निंबा फाटा परिसरात मूग पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकावर कीटकनाशकची महागडी फवारणी केली असून, तरीही रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. सद्यस्थितीत नया अंदुरा परिसरात पावसाने उघडीप दिल्याने मुगाची तोडणी सुरू आहे. परिसरात मुगाचे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
-------------------
मजुरांना दिले जवळचे पैसे!
मी दोन एकर मूग पेरला आहे. अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने व सतत ढगाळ वातावरणामुळे असल्यामुळे मला एकरी २० किलोच उत्पादन झाले. लागलेला खर्चही वसूल झालाच नाही, पण मजुरांना जवळचे पैसे द्यावे लागले, असे निंबा येथील शेतकरी रामेश्वर मोरखडे यांनी सांगितले.