अकोला, दि. १२- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या अशोक वाटिका रोडवरील निवासस्थानामध्ये एका पत्रकाराने मंगळवारी रात्री ११ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याने, यावेळी निवासस्थानावर कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचार्यांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नोटीस बजावली आहे. या चारही पोलिसांचे बयाण नोंदविल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे अशोक वाटिका ते गोयनका महिला महाविद्यालय रोडवर निवासस्थान आहे. या निवासस्थानाला दोन प्रवेशद्वार असून, एक अशोक वाटिका रोडवर, तर दुसरे प्रवेशद्वार सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या रोडवर आहे. या दोन्ही प्रवेशद्वारावर मंगळवारी रात्री एएसआय निळे, पोलीस कर्मचारी गावंडे, ढोरे आणि सावरकर कार्यरत होते. हे चारही पोलीस कर्मचारी कार्यरत असताना मंगळवारी रात्री ११ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास एका पत्रकाराने पोलीस अधीक्षक मीणा यांच्या निवासस्थानामध्ये थेट प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाच्या चोहीकडे हा पत्रकार फिरल्याची माहिती आहे. हा प्रकार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या लक्षात रात्री १२ वाजेच्या सुमारास येताच, त्यांनी मंगळवारी रात्री कार्यरत असलेल्या चारही पोलिसांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. या चारही पोलिसांचे बयाण घेण्यात येणार असून, त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेनंतर एका पत्रकाराने निवासस्थानामध्ये अनधिकृत प्रवेश केला. या प्रकरणी संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांचे बयाण घेण्यात येणार असून, त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. -चंद्रकिशोर मीणा,पोलीस अधीक्षक, अकोला.
‘एसपीं’च्या निवासस्थानी पत्रकाराचा अनधिकृत प्रवेश
By admin | Published: October 13, 2016 3:10 AM