राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भात विनापरवाना (अप्रमाणित) कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामातून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तासमोर होणार आहे. पश्चिम विदर्भात बोगस खते, बियाणे तसेच कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मागील काही वर्षात अशी अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. परंतु, अद्याप एकही ठोस कारवाई न झाल्याने कृषी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात २७ पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. यातील अनेक जणांची दृष्टी गेली. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक २0 शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, ४0३ शेतमजुरांना विषबाधा झाली. अकोला जिल्हय़ात सहा मूत्यू, तर १0५ च्यावर मजुरांना विषबाधा झाली होती. विषबाधेचा हा आकडा वाढतच आहे. कृषी विभागाला आता जाग आली असून, शेतकरी, शेतमजुरांना फवारणी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एक दिवस कार्यशाळा घेण्यात आली. पण, विनापरवाना तसेच बोगस कीटकनाशकासंदर्भात एकही ठोस कारवाई झालेली नाही. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज २ मध्ये माहेश्वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅर कंपनी फेज २ प्लॉट न. एफ -२२ मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणाहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविले जात होती. गुणनियंत्रण विभागाने मागील आठवड्यात येथे छापा टाकला होता. कीटकनाशकांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, कंपनीच्या संचालकाकडे विक्रीची कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे विभागीय गुणनियंत्रक विभागाच्या चमूने दोन्ही ठिकाणचे गोदाम सील करू न तण व कीटकनाशके जप्त केली आहेत.
२,९0९ लीटर कीटकनाशके जप्त!येथील एका गोदामातून रेम्बो जिब्रालिक अँसीड, रेनफिट प्रेटिकाक्लोर,ऑक्सीजन ट्रायाकॉन्टानॉल एकूण २,१३४ लीटर किंमत १४ लाख ९६ हजार ६८८ रुपयांचे जप्त केले. तर दुसर्या गोदामातून ७७५ लीटर पीलर तणनाशक जप्त केले. या रसायनाची किंमत ही ११ लाख ६८ हजार ६९0 रुपये आहे. दोन्हीची किंमत २६ लाख ६५ हजार ३७८ रुपये एवढी आहे.
अकोल्यात कारवाई पण..पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात अप्रमाणित बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये अकोला जिल्हय़ात २ हजार ९१४ लीटर कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. याची किंमत २६ लाख ६८ हजार रुपये आहे. पण, पुढील ठोस कारवाईच होत नसल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
ठोस कारवाई नाही!कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने गोदाम सील केले, पण ठोस कारवाई अद्याप झाली नाही. हे प्रकरण कृषी आयुक्तांकडे प्रस्तावित आहे. कृषी आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळात अधिकारी दाखल!यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणात विभागीय गुणनियंत्रण विभागाची चमू सोमवारी यवतमाळ पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. संबंधित कंपनी, विक्रेत्यांविरुद्ध तक्रार देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
आयुक्तांपुढे सुनावणी केव्हा ?अकोल्यात अप्रमाणित कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. हे प्रकरण कृषी आयुक्ताच्या दरबारात पोहोचले असल्याचे वृत्त आहे, पण सुनावणी होणार केव्हा, हा प्रश्न शेतकर्यांमधून विचारला जात आहे.
भरारी पथकांची कारवाई सुरू आहे. विभागातील पाचही जिल्हय़ात कीटकनाशक प्रकरणात अकोल्यात विक्रीबंदीचा आदेश काढण्यात आला आहे. अप्रमाणित बियाणे, रासायनिक खतासंदर्भात विक्रीबंदी व जप्तीची कारवाई केली आहे. -डॉ. पी. व्ही. चेडे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी, अमरावती.