- सदानंद सिरसाटअकोला : कापूस पिकामध्ये वापरण्यास अनधिकृत असतानाही शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस पिकातील तणाच्या नाशासाठी ग्लायफोसेटचा (तणनाशक) वापर सर्रास केला आहे. त्याला प्रतिबंध घालण्यात कृषी विभागाची यंत्रणा अपयशी ठरली असून, त्यामुळे मजूर, शेतकºयांना विषबाधेचे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खरिपाच्या पेरणीपूर्वीच ग्लायफोसेटच्या साठ्याची तपासणी करून कारवाई करण्याचे कृषी विभागाला बजावण्यात आले होते, हे विशेष.एचटीबीटी कापूस बियाण्यांची लागवड तसेच ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी मोहीम राबवण्याचे निर्देश राज्याच्या कृषी संचालकांनी मार्च २०१८ मध्येच दिले होते. मात्र, त्या मोहिमेत काय झाले, याची संकलित माहिती कृषी विभागाकडे नाही. या प्रकाराने एचटीबीटी कापूस बियाणे, ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापराला प्रोत्साहनच मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.खरीप हंगाम २०१७ मध्ये राज्यात कीटकनाशक, तणनाशकांची फवारणी किंवा हाताळणी करताना मोठ्या प्रमाणात विषबाधेच्या घटना घडल्या. यवतमाळ जिल्ह्यात तर शेकडो मृत्यू झाले. या गंभीर बाबींची पडताळणी उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. शिफारस केलेल्या पिकांऐवजी इतर पिकांसाठी कीटकनाशक, तणनाशकांचा वापर केल्याने विषबाधा झाल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले. ही बाब केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांनी मंजूर केलेल्या लेबल लिफलेटचे उल्लंघन करणारी आहे. तसेच कीटकनाशके कायद्याचाही भंग करणारी आहे. यापुढे असे प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा मंडळाने राज्याच्या कृषी विभागाला आधीच दिला आहे.
ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर प्रतिबंधितग्लायफोसेट तणनाशक कार्सिनोजनिक गुणधर्माचे आहे. त्याच्या वापरामुळे कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळे व नोंदणी समितीने त्या तणनाशकाची शिफारस वापर पिके नसलेली जमीन, चहामळ््यासाठीच केली आहे. तरीही एचटीबीटी कापसाचा पेरा झालेल्या भागात त्या तणनाशकाची विक्री झाली आहे.
भरारी पथकांच्या तपासण्या कागदावरच!ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर रोखण्यासाठी खरीप हंगामापूर्वीच भरारी पथके, गुणवत्ता निरीक्षक, कृषी सहायकांनी तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, तपासणी अहवालाची माहिती कृषी विभागाकडे नाही. ग्लायफोसेटचा वापर प्रतिबंधित आहे. आपल्या भागात त्याची विक्री साधारण आहे. एचटीबीटी बियाणे, तणनाशकाला रोखण्याचे प्रयत्न शासनाचे आहेत. - डॉ. एस.व्ही. चेडे, विभागीय गुणनियंत्रक, अमरावती.