अकोला : सद्य:स्थितीत व्हायरल तापीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लक्षणेही दिसून येत आहेत. यातील बहुतांश रुग्ण सुरुवातीला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी घेतात. मात्र, ॲन्टिबायोटिक्सच्या असंतुलित वापरामुळे रुग्णाचा आजार लवकर बरा होत नसल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किरकोळ आजार असला, तरी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावी, असा सल्लादेखील तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.
साधारणत: बॅक्टेरिया, फंगसमुळे इन्फेक्शन होत असून, त्याविरोधात ॲन्टिबायोटिक्सचा वापर केला जातो. अशा आजारांसाठी डॉक्टरही रुग्णांना ॲन्टिबायोटिक्स औषधी देतात. ही औषधी देताना डॉक्टर रुग्णांना विशिष्ट डोस देतात. मात्र, बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्यांकडून ॲन्टिबायोटिक्स औषध घेतात. रुग्णाला सुरुवातीलाच जास्त प्रमाणात ॲन्टिबायोटिक्स दिल्या गेल्यास पुढच्या वेळी त्याच आजारासाठी ॲन्टिबायोटिक्सचे प्रमाण आणखी वाढविण्याची शक्यता असते. अन्यथा रुग्णाचा आजार ॲन्टिबायोटिक्सला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे ॲन्टिबायोटिक्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात.
असे होतात परिणाम
सेंसेटिव्ह - ॲन्टिबायोटिक्सचा ठराविक डोस दिल्यावर रुग्ण बरा झाल्यास तो डोस रुग्णासाठी सेंसेटिव्ह ठरतो. त्यामुळे रुग्णावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. रुग्ण दुसऱ्यांदा आजारी पडल्यास डॉक्टर त्याच प्रमाणात किंवा कमी- अधिक प्रमाणात रुग्णाला ॲन्टिबायोटिक्सचा डोस देऊन रुग्णावर यशस्वी उपचार करू शकतात. कल्चर सेंसेटिव्हिटी टेस्ट केल्यानंतरच रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान होते. त्यानुसार डाॅक्टर औषधोपचार करतात.
रेजिस्टन्स - रुग्णाला दिलेला ॲन्टिबायोटिक्सचा डोस त्याला सूट होत नसेल, तर त्याला रेजिस्टन्स म्हटले जाते. त्यामुळे डॉक्टर डोस बदलून देतात.
रुग्णांमध्ये वाढतेय ‘एमडीआर’चे प्रमाण
मल्टी ड्रग रेजिस्टन्स बॅक्टेरिया (एमडीआर) चे इन्फेक्शन झाल्यास कितीही ॲन्टिबायोटिक्स दिल्यास रुग्ण त्याला प्रतिसाद देत नाही. ही स्थिती ॲन्टिबायोटिक्सच्या असंतुलित वापरामुळे उद्भवली आहे. गत काही वर्षांत रुग्णांमध्ये ‘एमडीआर’चे प्रमाण वाढत असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
साधा व्हायरल फिव्हर असेल, तर तीन दिवसांत रुग्ण बरा होतो. मात्र, रुग्ण बरा न झाल्यास औषधांची गरज पडते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. डॉक्टर वजनानुसार रुग्णांना बॅक्टेरियाचा डोस देत असल्याने रुग्णावर त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत.
किडनी, लिव्हरला धोका
शरीरातील अनावश्यक वस्तू बाहेर काढण्याचे प्रमुख काम किडनी आणि लिव्हर करतात. ॲन्टिबायोटिक्स घेतल्यानंतर त्यातील अनावश्यक घटक प्रामुख्याने किडनीमार्फतच बाहेर पडतात. ॲन्टिबायोटिक्स १२ ते २४ तास शरीरात राहतात. त्यामुळे या औषधांचा अनावश्यक वापर झाल्यास त्याचा किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
विषाणू नेहमीच आपले स्वरूप बदलतात. त्यानुसार त्यांच्यावर औषधोपचार करावा लागतो. मात्र, अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेताच गरजेपेक्षा जास्त ॲन्टिबायोटिक्सचा डोस घेतात. रुग्णाच्या शरीरासाठी हा प्रकार घातक ठरू शकतो. आजाराचे योग्य निदान करणे गरजेचे असून त्यासाठी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- डॉ. सागर थोटे, फुप्फुस रोगतज्ज्ञ, अकोला