सुनील काकडे/वाशिम: गतवर्षी वाशिम येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे, यंदाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी अमरावती विभागात हा मान वाशिम जिल्हा परिषदेला मिळाला होता. वाशिम जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने २0१४ मध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांबाबत सादर करण्यात आलेल्या खर्चात मोठय़ा प्रमाणात तफावत असून, कर्मचार्यांकडून गोळा झालेल्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. १७ डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर खडाजंगीही झाली. २0१३ च्या क्रीडा स्पर्धांमधील शिल्लक असलेला ४.६५ लाख रुपयांचा निधी आणि २0१४ मध्ये गोळा झालेला १३.१0 लाख रुपयांचा निधी, अशा एकंदरीत १७.७५ लाख रुपयांच्या निधीमधून केवळ १ हजार ८७८ रुपये शिल्लक असल्याचे दाखविण्यात आले. खर्चाच्या देयकांमध्ये तफावत आढळली असून, त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी क्रीडा सचिवास ३0 डिसेंबरपर्यंत बिनचूक हिशेब सादर करण्यास सांगितले आहे; मात्र या गैरव्यवहाराच्या प्रकरणामुळे प्रस्तावित विभागीय क्रीडा स्पर्धेची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याने ही स्पर्धा वाशिम येथे होईल अथवा विभागातील इतर जिल्हय़ात, याबाबत कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विभागीय क्रीडा स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट!
By admin | Published: December 29, 2015 2:05 AM