अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन भाचीवर तब्बल एक महिना लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस सात हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिचाच मामा असलेल्या २४ वर्षे युवकाने दुचाकीवर पळवून नेले. लग्नाचे तसेच विविध आमिष देऊन व आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन या अल्पवयीन मुलीवर तब्बल एक महिना लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती मुलीच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला माना पोलीस ठाण्यात दाखल केले. या ठिकाणी मुलीची चौकशी केली असता, तिच्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी माना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या मामा विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३६६, ५०४ व पॉस्को कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांच्या न्यायालयासमोर झाल्यानंतर त्यांनी साक्षीदार तपासले. आरोपी मामाच्या विरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ व ३६६ अन्वये दोषी ठरवत सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यासोबतच सात हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून एएसआय विल्हेकर व सोनू आडे यांनी कामकाज पाहिले.