अकोला : भाच्याचा रूमालाने कळा आवळून त्याचा हत्या केल्यानंतर मामाने भाच्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला; परंतु अकोट फैल पोलिसांना याविषयी संशय आल्याने, त्यांनी मामाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने, भाच्याची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी मामाविरुद्ध बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. भाच्याच्या दररोजच्या वादाला कंटाळून मामाने त्याचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली मामाने दिली. अकोट फैल परिसरातील इंदिरानगरातील शेख अकबर शेख अफसर (२३) याने २५ जुलैला रात्री १० वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती अकोट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम यांना मिळाली. त्यांनी पथकासोबत घटनास्थळ गाठले. पंचनामा करत असताना त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा त्यांना संशय आला. त्यासाठी त्यांना शवविच्छेदनाची प्रतीक्षा होती.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात युवकाचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी युवकाचा मामा शेख, अमीन शेख इकबाल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर भाच्यासोबत किरकोळ कारणावरून नेहमीच वाद व्हायचा. त्याच्या नेहमीच्या वादातून मामाने त्याची रूमालाने गळा आवळून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
मृतकाच्या आईच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी आरोपी शेख अमीन शेख इकबाल यांच्याविरुद्ध बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितीन सुशीर, हरिश्चंद्र दाते, सुनील टोपकर, असलम शेख, संजय पांडे, छोटू पवार, गिरीश तिडके यांनी केली.
व्यसनाधीन भाचा घालायचा धुडगूस
आरोपी शेख अमीन, शेख इकबाल हा शेख अकबर, शेख अफसर (२३) याचा मामा आहे. दोघेही शेजारी राहतात. शेख अकबर हा व्यसनाधीन असल्याने, दररोज तो घरात धुडगूस घालायचा. कुटुंबीयांना वेठीस धरायचा. त्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळूनच मामाने त्याचा काटा काढला.