लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यातून आजार पसरण्याचे प्रमाण जास्त असते. अशातच जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असून, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या पावसाळा असल्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या दिवसात पाणी उकळून पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो; मात्र जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरशिवाय पाणी पुरवठा होत असल्याचे जुलै महिन्याच्या अहवालातून समोर आले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यातून होणाºया आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याअनुषंगाने आरोग्य विभागातर्फे तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने वॉटर गार्ड पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोग शाळेमार्फत त्यांची तपासणी केली जाते.जुलै महिन्यात मिळालेल्या अहवालानुसार २८ ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न करता पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले.यामध्ये अकोला व बाळापूर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.