आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरीबाबत पुरस्कार प्राप्त असणाऱ्या हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड यांनी भेट दिली असता गांजर गवत तसेच कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या रुग्ण कल्याण समितीच्या खर्चाबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड यांनी विचारणा केली असता रेकॉर्ड दाखविण्यात आले नाही. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुस्कुटे यांनी सांगितल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड यांनी शेरे बुकात नमूद केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे इन्चार्ज डॉ. भुस्कुटे आजारी असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांचा रजेचा अर्ज हातरुण आरोग्य केंद्रात उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड यांना पाहण्यास मिळाला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचे रेकॉर्ड स्थानिक पातळीवर असणे गरजेचे असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या पाहणीत रेकॉर्ड दाखविण्यात आले नाही. त्यामुळे तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड यांनी या वेळी दिले. या वेळी जिल्हा परिषद सदस्यपती सुरेश गोरे, एजाज खान, साजिद शाह, डॉ. सागर बदरखे, डॉ. खान हजर होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे रेकॉर्ड ऑडिट करण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयात सादर केले होते. तत्काळ रेकॉर्ड हातरुण येथे उपलब्ध करून देण्यात येईल. माझ्या रजेचा अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात सादर केला आहे.
- डॉ. भुस्कुटे, आरोग्य केंद्र, हातरुण.
शासन कोट्यवधी रुपये आरोग्य सेवेवर खर्च करते. मात्र आरोग्य केंद्राच्या परिसरातील अस्वच्छता तसेच बाळापूर तालुक्यात रिक्त पदांची समस्या कायम आहे. याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.
- राम गव्हाणकर, सदस्य, जिल्हा परिषद
आरोग्य केंद्राच्या परिसरात अस्वच्छता दिसून आली. स्वच्छता करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे दिसते. याबत जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- सुनीता गोरे, सदस्या, जिल्हा परिषद