लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या दोघ प्रवाशांकडील मोबाइल व रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यापैकी दोन मुले अल्पवयीन आहे. आरोपींना जीआरपी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील डोंगरे, हेकाँ सावळे हे गस्तीवर असताना, त्यांना आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे साहित्य लंपास करणारी टोळी असल्याची माहिती मिळाली. त्यांना रेल्वेगाडीत दोन अल्पवयीन मुलांसह एक युवक संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनी काही प्रवाशांचे मोबाइल व रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी तिघांनाही रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी भारत राजेश मार्गे (१८ रा. बडनेरा) याच्यासह दोन अल्पवयीन मुले ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी कारंजा लाड येथील अब्दुल रशिद मोहम्मद इब्राहिम (रा. कारंजा लाड), विजय नाजुकराव कुरवाडे (रा. वानखेड, ता. संग्रामपूर) यांचे मोबाइल व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.