अकोला: समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत; परंतु गतवर्षीच्या तुलनेत शाळांमध्ये तीन हजारांवर विद्यार्थ्यांची वाढ झाल्यामुळे या वाढीव विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या ‘सीईओं’नी प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे उर्वरित ३ हजार ८७ विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश मिळणार आहे.समग्र शिक्षा अंतर्गत २0१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती, जमातीचे आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना शिक्षण विभागाकडून गणवेश देण्यात येतो. यंदा शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करण्यात आले. त्यासाठी ६७ लाख ७६ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात आली. या प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक तालुक्यात शाळांमध्ये वाढीव विद्यार्थी संख्या दिसून आली. सुरुवातीला जिल्ह्यातील ६३ हजार ३0८ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांना निधी देण्यात आला; परंतु यात ३ हजार ८७ विद्यार्थ्यांची वाढ झालेली दिसून आल्यामुळे आणि हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नये. त्यांनाही गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांकडे परवानगी मागितली आहे. त्यांची परवानगी मिळताच वाढीव विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
असे आहेत तालुकानिहाय वाढीव विद्यार्थीअकोला- ३३६अकोट- ४७४बाळापूर- ६२५मुर्तिजापूर- ७५0पातूर- ४१७तेल्हारा- ४८५........................एकूण- ३0८७