अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय सामाजिक उपक्रमांतर्गत ४० नागरिकांनी देहदानाचा, तर ६५ नागरिकांनी रक्तदानाचा संकल्प केला.‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग आर्ट गॅलरी सार्वजनिक गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांतर्गत मंगळवार, १० सप्टेंबर रोजी नेकलेस लोडचा राजा गणेशोत्सव मंडळात दिव्यांग आर्ट गॅलरीचे प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अरविंद देव, मयुरी सुळे, शीतल रायबोले, माधुरी तायडे, रोशनी काळे, टिव्ही कलाकार दीप्ती शेगोकार, दीपिका शेगोकार, मनोहर काळे यांनी विविध जनजागृतीपर गीते सादर केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष मयूर भदे, देवीदास चव्हाण, विद्या वाचस्पती, जीवन देशमुख, प्रफुल्ल वाडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रसाद झाडे, गजानन भांबुरकर, जानवी राठोड, श्रीकांत तळोकार, कार्तिक काळे, अक्षय राऊत, शिवाजी भोसले, तृप्ती भाटिया, स्मिता अग्रवाल, तुषार सिंगोकार, प्रा. नितीन सातव, सुरभी दोडके, वैष्णवी गोतमारे, विकास शेगोकार यांनी सामाजिक प्रबोधनात्मक संदेश दिले. या प्रसंगी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.गत पाच वर्षांत या विषयांवर जनजागृती‘दृष्टी गणेशा’ या उपक्रमांतर्गत दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे गत पाच वर्षात विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. यामध्ये रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, बेटी बचाओ बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदार जनजागृती, रोजगार निर्मिती व स्वावलंबन, सामाजिक एकता व बंधुभाव, महिला सक्षमीकरण, हुंडाबळी, भूकबळी आदी विषयांचा समावेश आहे.