अकाेला: ‘अमृत’याेजनेंतर्गत भूमिगत गटार व पाणीपुरवठा याेजनेचे काम निकाली काढल्या जात असून दाेन्ही याेजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तूर्तास भूमिगत याेजनेच्या कामाची मुदत संपुष्टात आल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने मुदतवाढीचा प्रस्ताव मनपाकडे सादर केल्याची माहिती आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीची गरज असल्याने सभागृहात विराेधकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’याेजने अंतर्गत शहरातील घाण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशातून भूमिगत गटार याेजना राबविली जात आहे. याेजनेसाठी शासनाने ८७ काेटी रुपये मंजूर केले असून ईगल इन्फ्रा कंपनीकडून काम केल्या जात आहे. याेजनेच्या पहिल्या टप्प्यात माेर्णा नदीपात्रातून मलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम करण्यात आले. घाण सांडपाण्यावर शिलाेडा येथे २७ एमएलडीचा मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी शेती किंवा उद्याेगांसाठी दिले जाणार आहे तसेच डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात ७ एमएलडी प्लँटचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, काेराेना विषाणूच्या अनुषंगाने शासनाने टाळेबंदी लागू केली हाेती. त्याकालावधीत सर्व उद्याेग, व्यवसाय व दळणवळण सुविधा ठप्प पडली हाेती. त्याचा परिणाम भूमिगतच्या कामावरही झाला. शासनाने टाळेबंदी शिथील करताच कंत्राटदाराने भूमिगतच्या कामाला सुरुवात केली असून मुदतवाढ संपुष्टात आली आहे तसा प्रस्ताव तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मनपा प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.
एक्स्प्रेस फिडरला खाेळंबा
भूमिगत गटार याेजनेतील २७ व ७ एमएलडी प्लँट कार्यान्वित करण्यासाठी मनपा प्रशासनाला एक्स्प्रेस फिडरची नितांत आवश्यकता आहे. आपातापा येथून ११ किंवा १४ केव्हीच्या विद्युत वाहिनीद्वारे एक्स्प्रेस फिडर सुरू केला जाईल; परंतु रेल्वे प्रशासनाने विद्युत वाहिनीवर तांत्रिक बाबी उपस्थित केल्या असून त्या दूर करण्यासाठी मनपाच्या स्तरावर प्रयत्न केल्या जात असल्याची माहिती आहे.
भूमिगत गटार याेजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मुदतवाढ दिल्यानंतर उर्वरित कामाला महिनाभराचा अवधी लागेल.
-सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग मनपा