लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या पारधी, वैदू समाजाचे काही लोक खडकीजवळ राहुटी किंवा पाल टाकून राहतात. येथील २0 ते २२ मुले शिक्षणापासून वंचित होती. ही बालकल्याण समितीने हेरून मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन या मुलांना खडकीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरती का होईना; परंतु शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यासाठी चाइल्ड लाइन आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे सहकार्य लाभले.खडकी परिसरात पारधी, वैदू समाजाचे काही लोक मजुरीनिमित्ताने आले आहेत. या ठिकाणी राहुटी टाकून हे लोक राहत असून, त्यांच्या राहुट्यांवर २0-२२ लहान मुले आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. एकही मूल शाळाबाह्य राहू नये, असे शासनाचे धोरण आहे; परंतु या धोरणाला प्राथमिक शिक्षण विभागाकडूनच हरताळ फासल्या जात आहे. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांना काही दिवसांपूर्वी राहुट्यांमधील लहान मुले खेळताना दिसून आली. त्यांनी चौकशी केली असता, ही मुले शाळा आणि शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती मिळाली. काळजी आणि संरक्षणाची गरज असणाºया मुलांपर्यंत पोहोचून त्यांनी चाइल्ड लाइन व शिक्षण विभागाच्या सहकार्याने या मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पालकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर शुक्रवारी आठ मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे तात्पुरत्या स्वरूपात दाखल केले. या विद्यार्थ्यांना शाळेकडून नवीन शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. या कामासाठी बालकल्याण समितीच्या सदस्य अॅड. सुनीता कपिले, प्रीती वाघमारे, चाइल्ड लाइनच्या सेंगर, बाल न्याय मंडळाचे सदस्य संजय सेंगर, शिक्षण विस्तार अधिकारी अश्विन मानकर, मुख्याध्यापिका हिंगणे यांचे सहकार्य लाभले. शाळाबाह्य मुलांबाबत शिक्षण विभाग उदासीनशहरात फिरताना अनेकदा शाळाबाह्य मुले आढळून येतात. या मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन शाळेत दाखल करता येते; परंतु याविषयी शाळा आणि शिक्षक उदासीन आहेत. खडकी येथील मुलांच्या बाबतीतसुद्धा असेच घडले. अखेर बालकल्याण समिती सदस्यांनी कायद्याची भाषा वापरल्यावर या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची तयारी दर्शविली.