अकाेला : वाढती बेराेजगारी, तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता या विविध कारणांमुळे ऑनलाइन वेबसाइटवर जाॅब सर्च करणाऱ्यांची संख्या वाढलेली असतानाच याचा माेठा गैरफायदा सायबर चाेरट्यांनी घेणे सुरू केले आहे. विविध वेबसाइटची निर्मिती करून त्या माध्यमातून बेराेजगार युवकांना लाखाेंनी गंडविल्याच्या घटना अकाेल्यात माेठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत. यासाेबतच व्यावसायिक कर्जाचे आमिष देऊन विविध शुल्काची मागणी करून हजाराे रुपयांनी अनेकांना गंडा घातल्याच्याही तक्रारी पाेलिसांकडे दाखल झालेल्या आहेत. काेराेनाच्या संकटानंतर ऑनलाइनचे कामकाज वाढले आहे. अनेकांचे कामकाज वर्क फ्राॅम हाेम झाले असून, काहींनी अनाेखी शक्कल लढवीत घरबसल्या कमवा, तसेच ऑनलाइन वेबसाइटवर नाेकरीचे आमिष देऊन फसवणूक करण्याचा गोरखधंदाच सुरू केला आहे. जिल्ह्यातील तब्बल ६४ बेराेजगारांची अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली असून, यामधील बहुतांश बेराेजगारांनी पाेलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत, तर काही प्रकरणांत ओळखीच्या व्यक्तींनी पैसे देण्याच्या माेबदल्यात सरकारी नाेकरी लावून देण्याचे आमिष दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआयडीसी, सिव्हिल लाइन्स व रामदास पेठ पाेलीस ठाण्यासह विविध पाेलीस ठाण्यांत फसणुकीचे गुन्हे दाखल असून, अनेक आराेपींना अटकही करण्यात आली आहे.
नाेकरीच्या नावाखाली फसवणूक वाढली
२०१९ १३ जणांची फसवणूक करण्यात आली.
२०१० ११ जणांची फसवणूक करण्यात आली.
२०२१ जूनपर्यंत ०५ जणांची फसवणूक करण्यात आली.
संकेतस्थळाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा.
अनाेळखी लिंक्स किंवा संकेतस्थळावर जाण्याचे टाळा.
धाेकादायक आणि फेक संकेतस्थळांना ॲन्टिव्हायरसद्वारे ब्लाॅक करा.
...अशी हाेऊ शकते फसवणूक
प्रकरण १
आदर्श काॅलनी येथील रहिवासी असलेल्या एका युवतीने फेसबुक, तसेच गुगलवर नाेकरी शाेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या युवतीच्या माेबाइलवर आपाेआप नाेकरीचे आमिष देणाऱ्या विविध वेबसाइटच्या लिंक्स यायला लागल्या. यामधील एका लिंकवर क्लिक केल्यानंतर तिची संपूर्ण माहिती अपलाेड करण्यात आली. ही माहिती सादर हाेताच प्राेसेसिंग फीच्या नावाखाली या युवतीला तब्बल १५ हजार रुपयांनी गंडविण्यात आले़
प्रकरण २
महाबीजमध्ये माेठ्या प्रमाणात रिक्त जागा निघाल्याची जाहिरात देण्यात आली. त्यानंतर नागपूर येथून ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. यादरम्यान काही युवकांना लाखाे रुपयांची मागणी करून नाेकरी देण्याचे आमिष देण्यात आले. युवकांनी पैशाची गुंतवणूकही केली. मात्र, काही दिवसांतच फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात एमआयडीसी पाेलिसांनी फसवणूक करणाऱ्यांना अटक केली हाेती. महाबीज कंपनीनेच या प्रकरणाची तक्रार केली हाेती की, त्यांच्या नावाने बनावट जाहिरात देऊन बेराेजगारांना गंडविण्यात येत आहे़
प्रकरण ३
रेल्वेत नाेकरीचे आमिष देऊन एका वेबसाइटच्या माध्यमातून खासगी हाॅटेलमध्ये युवकांचे अर्ज घेण्यात आले. त्यानंतर युवकांना भुसावळ येथे बाेलावून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती झाल्यानंतर काही युवकांकडून ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ज्यांनी ५ लाख रुपये दिले त्यांना रेल्वेत रुजू हाेण्याचे बनावट पत्रही देण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणावर रुजू व्हायला बेराेजगार गेले त्या ठिकाणी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
...अशी करा खातरजमा
एखाद्या ऑनलाइन वेबसाइटला भेट दिल्यानंतर त्याचाच आधार घेऊन डमी असलेल्या वेबसाइटच्या लिंक तुम्हाला आपाेआप येतील. या लिंक्स तपासण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती गाेळा करा. त्यानंतर अशा प्रकारची कंपनी किंवा कार्यालय आहे का, हे तुम्ही स्वत: त्या ठिकाणी तपासा. एखाद्यावेळी लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्राेसेसिंग शुल्क, ऑफिस शुल्काच्या नावाने पैशाची मागणी करण्यात येईल त्यावेळी फसवणूक झालीच, हे समजा. नाेकरी देणारी काेणतीही कंपनी तुम्हाला पैसे मागत नाही. त्यामुळे पैशांची मागणी झाल्यास अशा प्रकारच्या वेबसाइट तातडीने ब्लाॅक करा.
बेराेजगार युवकांनी राेजगार, तसेच नाेकरी शाेधत असताना अधिकृत वेबसाइटलाच भेट द्या. तुम्ही ऑनलाइन सर्च करीत असताना अनाेखळी लिंकवरून आमिष देण्यात येइल, त्यावेळी संयम ठेवून अशा प्रकारच्या लिंक ओपन करू नका. त्यामुळे तुमची फसवणूक टळेल.
-सचिन कदम,
शहर पाेलीस उपअधीक्षक, अकाेला