लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या २0 ते २५ बेरोजगार युवकांना शासकीय नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देऊन त्यांची तब्बल ५५.५ लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात खदान पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपी आणि फसवणूक झालेल्या युवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथे राहणारा अक्षय विलास खंडारे याच्या तक्रारीनुसार गावातीलच आरोपी बळीराम गवई याने समाजकल्याण आयुक्तालयातील अधिकाºयासोबत ओळख असून, शासकीय निवासी आश्रमशाळेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे दाखविले आणि खडकीतील स्नेह श्रद्धा वाटिकेतील आरोपी प्रवीण वासुदेव सुरवाडे याच्या घरी नेले. या ठिकाणी आरोपीसंध्या प्रवीण सुरवाडे, निर्मला निकम यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर आरोपींनीसुद्धा नोकरी लावून देतो. त्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. आरोपींनी अक्षय खंडारे, त्याचे कुटुंबीय आणि मित्र धनंजय साहेबराव शेगोकार यांना विश्वासात घेतले आणि बोगस समाजकल्याण अधिकाºयासोबत भेट घालून दिली.नोकरी लागेल या आशेने अक्षय खंडारे याने आरोपींना पाच लाख रुपये दिले; परंतु नोकरी लावून दिली नाही. नोकरीची आॅर्डर लवकरच येईल, अशा भूलथापा आरोपी देत राहिले. आरोपींकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अक्षय खंडारे याने खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. खदान पोलिसांनी तक्रारीनुसार मुख्य आरोपी प्रवीण सुरवाडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१, ५0६(३४) नुसार गुन्हा दाखल केला.
या युवकांचीही आर्थिक फसवणूकतक्रारीमध्ये फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील इतरही बेरोजगार युवकांची नावे आहेत. यात चिंचोली रुद्रायणी येथील धनंजय साहेबराव शेगोकार याची ५ लाखांनी, गोपाल नागोराव वाघ (३ लाख), अक्षय प्रमोद दांदळे (१.५ लाख), सोपान विलास गर्जे (५ लाख), सतीश नारायण सुरवाडे (२.५ लाख), सोपान हरिश्चंद्र आकोत (४ लाख), राहुल प्रकाश गर्जे (४ लाख), सांगवी दुर्गवाडा येथील अक्षय पखाले (४ लाख), पातूर येथील गोपाल संजय नाभरे (३ लाख), खेर्डा येथील शुभम संजय घोगरे(५ लाख), पारळा येथील भूषण अशोक गावंडे(५ लाख), म्हैसपूर येथील ज्ञानेश्वर गजानन उन्हाळे(२ लाख), पाटखेड येथील विशाल गोपाल नैवाल(२.५ लाख), अनिल नामदेव नैवाल(३ लाख), तांदळी येथील संदीप प्रल्हाद लखाडे(५ लाख) यांचा समावेश आहे.