अकोला- सुवर्णकारांनी कलाकुसरीतून आणि त्यांच्या कल्पनेतील डिझाइन्सद्वारे तयार केलेल्या सोन्याच्या दाग-दागिन्यांना महाराष्ट्रभरात वाढती मागणी आहे. मात्र, अलीकडे मोठमोठय़ा शहरातील सराफा दुकानांच्या गर्दीत आता ज्वेलरी, दाग-दागिन्यांचे शो-रूम शहरात स्थापित होत असल्याने स्थानिक सुवर्ण कारागिरांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार तर शहरात ८00 च्या जवळपास सुवर्णकारागीर आहेत. परंतु, अलीकडे तयार दागिन्यांना अधिक पसंती मिळत असल्याने सुवर्ण कारागिरांना बेरोजगारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात दीडहजार सुवणर्कार असून, त्यांच्या माध्यमातून विविध सुवर्ण कारागीर कोट्यवधींचे सोन्याचे दागिने बनवितात. सराफा बाजारात ५00 च्यावर छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. दिवाळी- दसर्यासारख्या मोठय़ा सणांमध्ये आणि गुरुपुष्यामृताला प्रत्येक दुकानदाराकडे खरेदीदारांची धूम असते. तसेच वर्षभर ग्राहक काही ना काही सोन्याची खरेदी करतात. सराफातील छोटे व्यावसायिक सिझनमध्ये दरदिवसाला १ ते २५0 ग्रॅमपर्यंत सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. मोठे व्यावसायिक १ ते अर्धा किलोपर्यंतच्या सोन्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक व्यावसायिकांकडे ५ ते १५ कारागीर आहेत. छोट्या दुकानांमध्ये कार्यरत कारागिरांना ३ ते ४ हजार रुपये वेतन दिले जाते. मोठय़ा दुकानातील अथवा शोरूममधील कारागिरांना ५ ते १0 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाते. ही मोठी तफावत पाहायला मिळत आहे. नथनीपासून मोठमोठय़ा हारांपर्यंतचे विविध दागिने सुवर्णकार ग्राहकांसाठी तयार करतात. या व्यवसायातूनच जिल्ह्यात दीड हजार सुवर्णकार आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या कारागिरांचे सुगीचे दिवस ओसरत असल्याचे दिसून येत आहे. शहरात मोठय़ा व्यापार्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे बहुतांश दागिने मशीनद्वारेच तयार करण्यात येत आहेत. राज्याबाहेरील सुवर्ण कारागीर अकोल्यात दाखल होत असल्याने, स्थानिक कारागिरांवर घरी बसण्याची पाळी आली आहे. सराफा व्यावसायिकांकडे पूर्वी दागिन्यांबाबत अनेक कामे येत होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षात कामे अचानक कमी झाली आहेत. त्यामुळे आता शो-रूममध्ये कमी पैशात कामे करणे भाग पडत आहे.
*सर्वाधिक कारागीर पश्चिम बंगालचे
अकोला शहर व जिल्हय़ातील सराफा व्यावसायिकांकडे स्थानिक कारागिरांसोबतच परप्रांतीय कारागीर मोठय़ा प्रमाणात आहेत. पश्चिम बंगालमधील हजार-बाराशे कारागीर सराफा व्यवसायानिमित्त येथेच स्थायिक झाले आहेत. तसेच शोरूममध्ये सुद्धा स्थानिक कारागिरांपेक्षा परप्रांतीय कारागिरांना महत्त्व दिले जात आहे.