अकोला, दि. १३ : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या खांबोराजवळील उन्नई बंधारा आटला (ड्राय) आहे. बंधार्यातील पाणी संपल्याने, गत शुक्रवारपासून ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातच या गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने, महान येथील काटेपूर्णा धरणातून ६४ गावांना पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे.जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे धरणातील पाणी अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आले होते. पाणीटंचाईच्या परिस्थितीत गत उन्हाळ्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गत जुलैमध्ये पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उन्नई बंधार्यातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; परंतु ९ सप्टेंबर रोजी उन्नई बंधार्यातील पाणी संपले. त्यामुळे या बंधार्यांतून ६४ गावांना सुरू असलेला पाणीपुरवठा बंद झाला. पाणीपुरवठा बंद झाल्याने पावसाळ्यातच ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्नई बंधार्यातील पाणी संपण्याच्या मार्गावर असतानाच खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकोला उपविभाग कार्यालयामार्फत ७ सप्टेंबर रोजी अकोला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली. ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट;पाणी सोडण्याची प्रतीक्षा!उन्नई बंधार्यातील पाणी संपुष्टात आल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर महान येथील काटेपूर्णा धरणातून ६४ गावांना पाणी केव्हा सोडले जाणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
उन्नई बंधारा ‘ड्राय’; ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद!
By admin | Published: September 14, 2016 2:07 AM