विझोरा : वीज बिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक धास्तावले आहेत. विझोरा परिसरात शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता महावितरणकडून कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने पिके धोक्यात सापडली आहेत. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून रब्बी व उन्हाळी पिकांची पेरणी केली. ऐन मोसमात विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
विझोरा उप कर्षन केंद्रातंर्गत कातखेड, विझोरा, येळवण, एरंडा, गोरव्हा, परंडा, मासा, डोंगरगांव, सराव आदी गावांचा समावेश आहे. परिसरात यंदा उन्हाळी पिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सद्यस्थितीत पिके बहरलेली असताना महावितरण कंपनीकडून कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने पिके धोक्यात सापडली आहेत. सध्या शेतात रब्बीसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. विजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिके सुकत चालली आहेत. परिसरात महावितरणकडून थकीत वीज बिलांची वसुली करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. थकीत विज बील असणाऱ्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
-------------------------------
शेतकरी संकटात
वीज बिल थकीत असल्यामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्या जात असल्याने उन्हाळी पिके धोक्यात सापडले आहेत. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात नुकसान झाले. लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी हतबल झाला होता. असे असतानाही पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली, सध्या पिके चागल्या स्थितीत आहेत; मात्र विजेअभावी पिके सुकत चालले असल्याने शेतकरी संकटात सापडला आहेत.