अकोला :-प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेचे लाभार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास , माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये गोल्डन कार्डचे वाटप करण्यांत आले.यावेळी आमदार रणधिर सावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे , औरंगाबाद येथील नायलेट यंत्रणेचे प्रमुख संजीव गुप्ता, सीएससी केंद्राचे राज्य प्रमुख वैभव देशपांडे , प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डॉ. अश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे पुढे म्हणाले की, कोणतेही काम सुरू झाल्यावर अडचणी येत असतात. आपण केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वानी जबाबदारीने काम करायला पाहीजे असे प्रतिपादन संजय धोत्रे यांनी केले.आमदार रणधिर सावरकर आपल्या मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेचे काम जिल्हयात पारदर्शक होत आहे. त्याला पाठबळ देण्याचे आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या काही लाभार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते गोल्डन कार्डचे वितरणही करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेबाबत मार्गदर्शन केले. सदर योजना संपुर्ण ग्रामीण भागापर्यंत पोहचून त्याचा लाभ सर्व जणांना मिळणे आवश्यक आहे. सर्वात जास्त काम आशा वर्कर्स करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळत नाही . त्यांना मानधन कसे मिळणार याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले. आयुष प्रसाद यांनी अकोला येथे आयटी पार्क सुरू करण्यासाठी सादरीकरण केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तत्पुर्वी, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ग्रामपंचायत संबंधी आढावा बैठक घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व योजनेचे मार्गदर्शन डॉ. अश्विनी खडसे यांनी केले तसेच संचालन व आभार प्रदर्शन प्रिती शिंदे यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेच्या 'गोल्डन कार्ड'चे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 6:38 PM