अकोला : महापालिका क्षेत्रात जीवघेण्या कोरोना विषाणूचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्या पृष्ठभूमीवर सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी महापालिका प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये नामदार धोत्रे यांनी अकोलेकरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आढावा बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, मनपा आयुक्त संजय कापडणीस, स्थायी समिती सभापती सतीश ढगे, माजी नगरसेवक जयंत मसने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अकोल्यातील प्रभाग क्रमांक २ मधील अकोट फैल आणि प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागामध्ये कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने सील केलेल्या परिसरातील तसेच कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणी बाबत ना. संजय धोत्रे यांनी विचारणा केली. या भागात कोरोनाचा धोका वाढू नये यासंदर्भात मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा संपूर्ण आढावा घेतला.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महापालिकेचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 6:06 PM