- आशिष गावंडे
अकोला: खासदार संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर आरू ढ होऊन अकोला जिल्ह्याच्याच नव्हे, तर पश्चिम विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. खा. धोत्रे यांच्या रूपाने पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग आला आहे. खा. धोत्रे यांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.विदर्भाचा रखडलेला अनुशेष दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे. २०१४ मध्ये मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा समावेश करण्यात आला होता. नितीन गडकरी यांनी विदर्भात रस्त्यांचे जाळे विणण्यासोबतच नदी खोलीकरणाला प्राधान्य दिले. संपूर्ण विदर्भात व त्यातही पश्चिम विदर्भातून भाजप-शिवसेनेला जनतेची नेहमीच साथ मिळाल्याचे दिसून येते. अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा तब्बल २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेऊन दमदार विजय मिळवित जिल्ह्यात विक्रम केला. यात भरीस भर खा. धोत्रे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने जिल्ह्यात नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी पश्चिम विदर्भाच्या वाट्याला चार वेळा केंद्रीय मंत्रिपद लाभले असून, खा. धोत्रे यांच्या निवडीमुळे पाचव्यांदा योग आला आहे.असे होते पश्चिम विदर्भातील केंद्रीय मंत्री* अमरावती येथून काँग्रेसचे तत्कालीन खा. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड. केंद्रीय मंत्रिमंडळात १९५२-६२ मध्ये देशाचे कृषी मंत्री म्हणून कामकाज सांभाळले.* वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तत्कालीन खा. गुलामनबी आझाद यांची १९८०-८४ या दरम्यान केंद्रीय कायदा व उद्योग व्यवहार राज्यमंत्रीपदी निवड.* काँग्रेसचे तत्कालीन खा. मुकुल वासनिक यांची बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून १९९३-९६ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास युवक कल्याण व क्रीडा खात्याचे राज्यमंत्रीपदी निवड.* बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तत्कालीन खा. आनंदराव अडसूळ यांची २००२-०४ या कालावधीत केंद्रीय अर्थराज्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.