अकोला: अकोला शहरातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिली.जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक स्तरावरील आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, केंद्रीय विद्यालय संघटना मुंबई विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त एस.पी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक चड्डा, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार उपस्थित होते. केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया फेबु्रवारीपासून सुरू होत असते व एप्रिलपासून नवीन सत्राला सत्राला सुरुवात होते, अशी माहिती केंद्रीय विद्यालय संघटना मुंबई विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त एस.पी. पाटील यांनी बैठकीत दिली. अकोल्यातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात केंद्रीय विद्यालय पुढील सत्रापासून सुरू करण्यात येणार असून, केंद्रीय विद्यालयासाठी आगरकर विद्यालयातील १५ खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यासाठी दुरुस्ती व केंद्रीय विद्यालयाच्या मानकाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने महिनाभरात शासनाकडे पाठविण्याचे सांगत, जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू होणार असल्याने, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यावेळी दिल्या.इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्या!केंद्रीय विद्यालय इमारत बांधकामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने खुली जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. उपलब्ध करून दिलेल्या जागेवर येत्या दोन वर्षात केंद्रीय विद्यालयाच्या मानकाप्रमाणे केंद्रीय विद्यालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बैठकीत दिली.