अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरु केलेल्या ‘शिवराई’ नाण्यांचा अनोखा संग्रह अकोला येथील अक्षय खाडे या संग्राहकाकडे आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात सुरु केलेल्या तांब्याच्या नाण्यास शिवराई या नावाने ओळखल्या जाते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाच्या निमित्ताने १६७४ मध्ये सुवर्ण होन व तांब्याची शिवराई नाणी तयार केली होती. सुवर्ण होन केवळ राज्यभिषेकासाठी , तर शिवराई नाणी व्यवहारासाठी चलनात आणली होती. शिवाजी महाराजांनी सुरु केलेली ही नाणी संभाजी महाराज, पेशवे व ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातही चलनात होती. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत शिवराई हा नाणे प्रकार अस्तित्वात होता. पेशव्यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या शिवराई नाण्यांवर पुढील बाजूस श्री,राजा व मागील बाजूस छत्र, पती अशी अक्षरे अंकित आहेत. काही नाण्यांवर शमीपत्र, त्रिशुल, महादेवाची पिंड, बेलपत्र अशी विविध चिन्हे आहेत, अशी माहिती नाणे संग्राहक अक्षय खाडे यांनी दिली. अक्षय खाडे यांच्याकडे शिवराई नाण्यांचाच नव्हे, तर जगातील सर्व देशांच्या चलनी नोटा व ऐतिहासिक नाण्यांचा मोठा संग्रह आहे.असे आहे शिवराई नाणेशिवाजी महाराज यांच्या काळात तांबे धातूपासून शिवराई नाणी तयार करण्यात आली. या नाण्याच्या दर्शनी भागावर श्री, राजा, शिव ही अक्षरे, तर मागच्या बाजूस छत्र, पती अशी अक्षरे अंकित आहेत.