- सचिन राऊत
अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) धडाका आता जोरात सुरू झालेला असतानाच लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या बुकींनी आता आयपीएलच्या सामन्यांवर मोठी उलाढाल सुरू केली आहे. कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे सट्टाबाजार तसेच हवाला बंद असताना आता ती कमाई भरून काढण्यासाठी अकोल्यातील सट्टा माफियांनी अनोखी पध्दत व शक्कल लढवित सट्ट्याची देवाण-घेवाण सुरू केली आहे. यामध्ये ब्रिफकेस ऑपरेटेड युजर आयडी, नवनवीन मोबाइल अॅप आणि जुन्या बुकींच्या माध्यमातून नवीन ग्राहकांना एंट्री या पध्दतीने सट्टा बाजार चालविण्यात येत आहे.
आयपीएलच्या सामन्यांवर सट्ट्याची देवाण-घेवाण करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील मोेठ्या बुकींनी जुनी पध्दत बाजूला सारत नवीन टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना अडचणी येत असल्या तरी या बुकींची संपूर्ण कुंडलीच अकोला पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांकडे आहे, मात्र हे पोलीसच या बुकींच्या संपर्कात राहून त्यांना ‘अर्थ’कारणातून सहकार्य करीत असल्याने जिल्हाभर आयपीएलचा हंगाम कॅश करण्यात येत आहे. एका सामन्यावर १०० कोटी रुपयांची उलाढात होत असतानाही पोलिसांनी मात्र मोेठी कारवाई केली नसल्याने त्यांचेही बुकींसोबत लागेबांधे असल्याची चर्चा आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह नवीन पोलीस अधिकाºयांनी पदभार स्वीकारल्यानंतर या मोठ्या बुकींवर कारवाई होण्याची आशा अकोलेकरांना होती, मात्र अद्याप तरी तशा प्रकारची कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे.
विशिष्ट पोलीस झाले मॅनेज
आयपीएलच्या सामन्यांवर एका बुकीकडून तब्बल ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल सुरू असताना पोलिसांनी मात्र किरकोळ कारवाया करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या काही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सट्टा माफियांचे जाळे माहिती आहे ते अधिकारी व कर्मचारी सट्टा माफियांनी मॅनेज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अकोल्यात कोट्ट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू असतानाही कारवाई मात्र केवळ किरकोळ बुकींवरच होत असल्याचे वास्तव आहे.
मीणांनी आवळल्या होत्या मुसक्या
अकोल्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बड्या बुकींवर कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या धाकाने बुकींनी त्यांचे बस्ताने वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर सुरू केले होते, मात्र मीणा यांच्या पथकाने सीमेवर जाऊन कारवाई करीत बुकींना मोेठा धक्का दिला होता. यासोबतच अकोटातील डब्बा ट्रेडिंग व बुकी भुतडा याच्यावरही कारवाई केल्याने बड्यांचे धाबे दणाणले होते.