अकोला : अकोलेकरांजवळून थकीत कर वसुली करताना महापालिकेच्या मालमत्ता विभागाची दमछाक होते. शहरातील मालमत्तांचा शोध घेताना होणारी पायपीट कमी करण्यासोबतच नागरिकांच्या घराचा अचूक पत्ता उपलब्ध व्हावा, यासाठी सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या घरांसह इमारतींवर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी मनपाच्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.महापालिकेचे स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी शहर विकासाच्या विविध विषयांवर सभेचे आयोजन केले होते. प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर मालमत्तांची अचूक नोंदणी करणे शक्य झाले आहे. नागरिकांना घरबसल्या आॅनलाइन प्रणाली किंवा पॉस मशीनद्वारे मालमत्ता कर जमा करता येणार आहे. आॅनलाइन प्रणालीचा वापर कितपत होतो, ही बाब लक्षात घेता सत्ताधारी भाजपाने मालमत्ताधारकांच्या घरावर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मालमत्ताधारकांचा शोध घेताना प्रशासनाची पायपीट होणार नसल्याचे बोलल्या जाते. राज्यातील इतर महापालिकांमध्ये मालमत्तांवर क्रमांक टाकण्यात आले आहेत. मालमत्तांवर युनिक नंबर प्लेट लावण्यासाठी नाशिक येथील भोलानाथ स्मृती अॅण्ड कंपनीला कंत्राट दिला जाईल. स्थायी समितीच्या सभागृहात हा विषय पटलावर आला असता, कंपनीच्यावतीने प्रति मालमत्ताधारकाला ५० रुपये शुल्क आकारल्या जाणार असले, तरी शुल्क आकारणीबाबत मनपा आयुक्तांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे मत व्यक्त करीत सभापती विशाल इंगळे यांनी हा विषय मंजूर केला.
शहराचा पाचपटीने विस्तार!तत्कालीन नगर परिषदेच्या काळात शहरातील मालमत्तांवर क्रमांक टाकण्यात आले होते. आता हद्दवाढीमुळे शहराचा पाचपट विस्तार झाला असून, मालमत्तांवर क्रमांक टाकल्यास मनपासह पोलीस प्रशासनाला याचा फायदा होणार असल्याचे मत नगरसेवक अनिल गरड यांनी व्यक्त केले. प्लेटचे दर निश्चित करून या विषयाला मंजुरी देण्याची सूचना नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी केली.या विषयाला दिली मंजुरी* अग्निशमन विभागासाठी नवीन वाहनाची खरेदी* शिवसेना वसाहतमधील ११ केव्ही उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे स्थलांतरण* फुलारी गल्ली येथील मनपा मुलींची शाळा क्र. १ चे बांधकाम पूर्ण करणे* अमृत अभियानांतर्गत निर्माण केलेल्या ग्रीन झोनला ६८ लाख ८६ हजार रुपये निधीतून तारेचे कुंपण* नागरी दलित वस्तीच्या ३२ लाख निधीतून जुने शहरातील श्रीवास्तव चौक ते भीम नगर चौकपर्यंत सिमेंट रस्ता