विजय शिंदे अकोट (अकोला) : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज अकोट शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोनावेळी एका नवदाम्पत्याने लग्न लावून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजीही केल्याचे आगळे-वेगळे चित्र पहायला मिळाले. एकीकडे आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले असताना, दुसरीकडे मराठा समाजातील या जोडप्याने शांतीप्रिय विवाहसोहळ्यातून सकारात्मक दर्शन घडवले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून अवघा महाराष्ट्र पेटला आहे. आजही सर्वत्र जाळपोळ आणि हिंसक आंदोलन सुरु झाले आहे. क्रांतीदिनी अनेक ठिकाणी आंदोलन भरकटले असतानाच, अकोला जिल्ह्यातील अकोट येथे चक्का जाम आंदोलनावेळी मराठा समाजातील सकारात्मक दृष्टीकोन समोर आला. शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी अकोट तालुक्यातील देऊगांव येथील हरिदास गावंडे यांची मुलगी तेजस्विनी व गांधीग्राम येथील पांडुरंग अढाऊ यांचा मुलगा अभिमन्यू यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी आंदोलनाचे स्वरुप विवाह सोहळ्यामध्ये काही काहीसाठी रुपांतरीत झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात दोन्ही कुटुबीयांकडील वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली होती. मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसह मंगलाष्टके पार पडली. वर-वधुंनीसुध्दा मराठा आरक्षणाचा नारा दिला. सदर विवाह सोहळा हा स्थानिक कास्तकार भवन या ठिकाणी 9 ऑगस्ट रोजी सकाळी पार पडणार होता. परंतु, दोन्ही कुटुंबीयांनी कास्तकार भवन असतानाही आंदोलनात सहभागी होऊन विवाह सोहळा करण्याचे ठरविले. या दोन्ही कुटुंबीयांच्या निर्णयाला सर्वच पाहुणे मंडळींनी होकार देत आंदोलनात सहभागी होऊन मराठा समाजातील सकारात्मक विचारसरणीचा संदेश दिला.
पाहा व्हिडिओ -