अकोला: श्री शिवाजी महाविद्यालयातील संगीत विभागातील प्राध्यापकाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अँकेडमिक स्टाफ कॉलेजमध्ये धुडगूस घातला. या विभागात प्रशिक्षणासाठी असलेल्या प्राध्यापकांनी धुडगूस घालणार्या प्रा. अनिल काळे याची तक्रार विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. अनिल काळे याने एका प्राध्यापिकेचा विनयभंग केल्यानंतर त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी या प्राध्यापकाचा शोध सुरू केला असतानाच, सदर प्राध्यापकाने आकोट येथील शिवाजी महाविद्यालयातील लिपिक खवले यांची बॅग लंपास केली होती. याप्रकरणी अमरावती येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी प्रा. अनिल काळे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अँकेडमिक स्टाफ कॉलेजमध्ये गेले. या ठिकाणी विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रशिक्षण सुरू असतानाच प्रा. काळे यांनी शिवाजी महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेला धमकावले तसेच इतर प्राध्यापकांनाही काळे यांच्या वागणुकीमुळे त्रास झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्राध्यापकांनी प्रा. अनिल काळे याच्याविरुद्ध कुलसचिवांकडे तक्रार केली. सदर प्राध्यापकाने शिवाजी महाविद्यालयातील एकाही प्राध्यापकाचे विद्यापीठात काम होऊ देणार नसल्याचा इशाराही दिल्याने या प्राध्यापकांनी तक्रार केली आहे. प्रा. अनिल काळे खुलेआम फिरत असताना त्याला अटक करण्यात रामदासपेठ पोलिसांकडून गांभीर्याने तपास करण्यात येत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
अकोल्याच्या प्राध्यापकाचा विद्यापीठात धुडगूस
By admin | Published: December 02, 2015 2:50 AM