लोकमत न्यूज नेटवर्ककुरुम : पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या कुरुम बिटमधील मधापुरी शिवारात अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना गुरुवार, १३ जुलै रोजी समोर आली. सदर इसम हा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी माना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मधापुरी येथील शेतकरी सुनील निळकंठराव ठाकरे हे मधापुरी शिवारातील आपल्या गट क्र. १३१ मधील शेतात सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीजवळ रक्ताचे डाग आढळले. त्यांनी विहिरीत पाहिले असता सदर अनोळखी इसम हा पाण्यात तरंगलेला आढळून आला.यावेळी सदर घटनेची माहिती माना पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार मिलिंदकुमार बाहकर, कुरुम बिटचे प्रभारी उपनिरीक्षक राजेश जोशी हे आपल्या सहकाऱ्यांसह तसेच मूर्तिजापूर येथील आपत्कालीन पथक हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन पथकाने सदर मृतदेह हा विहिरीच्या वर काढला असता, सदर मृतकाचे अंदाजे वय ४५ वर्षे आहे. अंगात पिवळ्या रंगाचे निळे पट्टे असलेले हाप बाह्याचे टी-शर्ट, त्यावर फॅन्सी-२ लिहिलेले आहे. मृतकाच्या डोक्यात व हातावर चार ते पाच धारदार शस्त्राचे घाव आढळले. सदर मृतकाचा खिशात रेल्वेचे तिकीट, डायरी आदी साहित्य सापडल्याने तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली, तसेच अमरावतीवरून डॉग युनिट बोलावण्यात आले होते. यावेळी हिरा नामक श्वानाने घटनास्थळाची तपासणी केली; परंतु ते अपयशी ठरले. मूर्तिजापूर आपत्कालीन पथकाचे उपाध्यक्ष लकी अग्रवाल, कोषाध्यक्ष संदीप संघेल, सदस्य मो. इम्रान, रितेश चिनप्पा, दीपक संघेल, रेहान यांनी सहकार्य केले. याप्रकरणी मधापुरीचे पोलीस पाटील रमेश सोळंके यांच्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास उपनिरीक्षक राजेश जोशी व त्यांचे सहकारी ना.पो.काँ. राजेश वायधने. पो.काँ. नीलेश इंगळे, भूषण नेमाडे करीत आहेत.
मधापुरी शिवारात अज्ञात इसमाची हत्या
By admin | Published: July 14, 2017 1:10 AM