जनावरांना वाचविण्यासाठी पशुधन विकास अधिकारी यांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत; परंतु या आजाराचे निदान लागत नसल्याने जाफरापूर येथे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जनावरांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
आधीच कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे शेतकरी, शेतमजूरांवर उपासमारीची पाळी आली आहे, आता या जनावरांमधील आजारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गावामध्ये काही जनावरांना अज्ञात ताप आला असून बैल खुरी आल्याचे प्रमाण वाढत आहे. जाफरापूर मधील महादेवराव साबळे यांची एक म्हैस, एक वगार मृत पावल्यामुळे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, जनार्धन बोदडे यांचे दोन गोरे मृत पावल्यामुळे त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रामदास शेगोकार यांचा एक गोरा मृत पावल्यामुळे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. गजानन साबळे यांची एक वगार मृत पावल्यामुळे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले, गजानन वसो यांचा एक गोरा मृत पावल्यामुळे त्यांचेसुद्धा दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. गोपाळा बोदळे यांचे तीन गोरे व दोन गाई मृत पावल्यामुळे त्यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
--कोट-
जाफरापूरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अज्ञात तापामुळे जनावरांचा मृत्यू होत आहे. हा मृत्यू निश्चितपणे कशामुळे होत आहे याकरिता रक्ताचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
डॉ. एम. ए .दांदळे, पशुधन विकास अधिकारी, तेल्हारा
--कोट--
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. तर अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी चिंतित आहे. या अज्ञात आजारामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्याकरिता शासनाने शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावी.
रामकृष्ण नागोलकार, माजी उपसभापती, बाजार समिती, तेल्हारा