तळेगाव बाजार : शेतजमिनिचा विनापरवाना अकृषक वापर केल्याबद्दल येथील सौर ऊर्जा प्रकल्पांना महसूल विभागाने २१ लाख १७ हजार रुपयांचा दंड केला आहे. याबाबत महसूल विभागाने नाेटीस बजावली आहे.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार ग्रामपंचायतच्या हद्दीत इंडियो जेनरेशन प्रा. लि, आयरॉन हाईड जेनरेशन व नंदकुमार रामानुजालु नायडू या तीन कंपन्यांनी मालपुरा राेडच्या बाजूला साैरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत.
तिन्ही सौर ऊर्जा कंपनीने शेतजमिनीचा विनापरवाना अकृषक वापर केल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. तिन्ही कंपन्यांना २१ लाख १७ हजार ८०० रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. तळेगाव बाजार येथील हद्दीत तळेगाव बु. मालपुरा रोडच्या बाजूला अंदाजे ७० एकर जमीन क्षेत्रावर तिन्ही कंपन्यांनी महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या क्षेत्रात सोलर प्लांटची उभारणी केली. यामध्ये १९७००, ८९६००,९०५ या क्षेत्रावर विनापरवाना अकृषक वापर केल्याबद्दल तेल्हारा तहसीलदार राजेश गुरव यांनी दंडाची नोटीस बजावली आहे.