लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन उघडल्यानंतर अनेक व्यवसायांना परवानगी मिळाली; मात्र सलून व्यवसायावरील बंधन कायम राहिले. हातावर पोट असलेल्या या व्यवसातील हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावले होते; मात्र २८ जूनपासून आता सलून व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने शुक्रवारी अकोल्यातील सलून दूकाने साफसफाई तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी दुकानदारांनी उघडली होती.अकोला शहरात जवळपास ८०० सलूनची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानावर काम करणारे अनेक कारागीर हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे शहरात भाड्याचे घर अन् भाड्याचे दुकान हा प्रमुख खर्च या कारागिरांच्या समोर असतो. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात या कारागिरांचे उत्पन्नच ठप्प झाल्याने अनेकांना तात्पुरता भाजी विक्रीसारखा पर्यायी व्यवयास शोधावा लागला; मात्र सर्वांनाच ते जमले नाही. त्यामुळे दुकाने कधी उघडतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अखेर २८ जूनपासून केवळ कटिंगसाठी का होईना दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी जवळपास सर्वच दुकानांमध्ये साफसफाई सुरू होती. अनेकानी सॅनिटायझरने फवारणी करून दुकाने निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. एरव्ही रविवार हा गर्दीचा दिवस असतो व आता रविवारीच दुकाने सुरू होणार असल्याने ग्राहकांची गर्दी होणार नाही, कोरोना प्रतिबंधात्कम उपायाची अंमलबजावणीसुद्धा होईल, यासाठी दक्षता घेण्याचे नियोजन अनेक दुकानदारांनी केले.
दर वाढतीलकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला नवीन वस्तरा, नवीन अॅप्रन द्यावी लागणार आहे, त्यामुळे साहजिकच हा वाढीव खर्च ग्राहकांनाच करावा लागणार आहे.त्यामुळे कटिंग, दाढी, फेशिअल अशा सर्वच ग्राहक सेवेचे दर वाढवावे लागतील, असे नाभिक समाज दुकानदार संघटनेने स्पष्ट केले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वापरा आणि फेकून द्या, अशा स्वरूपातील साहित्य ग्राहकांना पुरविले जाणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक दर आकारले जाणार आहेत. सर्व सलूनधारकांनाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली आहे. त्याचे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. ग्राहक सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास आहे.- गजानन वाघमारेअध्यक्ष नाभिक समाज दुकानदार संघटना
ग्राहकांना सेवा देताना ती अधिक सुरक्षित असावी यासाठी दुकानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तीन महिन्यांपासून रोजगार ठप्प झाला होता. आता रविवारपासून पुन्हा नव्या उमेदीने दुकाने सुरू होत असल्याने आनंद वाटत आहे.- प्रकाश आंबुस्कर,सलून मालक