अकोला : पाणीटंचाईमुळे बंद झालेला अकोलाएमआयडीसीतील उद्योगांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. तूर्त कुंभारीच्या तलावातून पाणी पुरवठा केला जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा या तलावात आहे, त्यानंतर काटेपूर्णातील आरक्षित जलसाठ्यातून पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकोला एमआयडीसीत जवळपास सहाशे उद्योग सक्रिय आहेत. येथील उद्योगांना दर दोन वर्षांनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. काटेपूर्णा जल प्रकल्पातील पाणी संपुष्टात आले की कुंभारी तलावावरच उद्योगांना तहान भागवावी लागते. कुंभारी तलावातील पाणी पुरवठा संपुष्टात आल्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील खासगी हायड्रंटवरून पाणी मिळवून उद्योगांना संजीवनी दिली गेली; मात्र येथील चार केमिकल्स कंपन्यांवर अक्षरश: बंद पडण्याची वेळ आली होती. तेल रिफायनरीचे उद्योगही धोक्यात आले होते. अनेकांनी उद्योग बंद ठेवून कामगारांना सुटी दिली होती; मात्र जून आणि जुलैमध्ये काटेपूर्णा जलाशयाच्या क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने ३६.४२ टक्के जलसाठा झाला आहे. सोबतच उद्योगांसाठी पर्यायी असलेल्या कुंभारी तलावातही मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अकोला एमआयडीसी प्रशासनाने यंदा कुंभारी तलावातील पाण्याच्या साठ्याची उचल सुरू केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत भागणारे पाणी संपुष्टात आल्यानंतर काटेपूर्णा जलाशयातील उद्योगांसाठी आरक्षित असलेले पाणी घेतले जाणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.२८ किमी लांबीची स्वतंत्र पाइपलाइनअकोला औद्योगिक वसाहतीमधील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दररोज सहा द.ल.घ.मी. पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेली योजना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आणि उद्योजकांच्या पुढाकाराने मंजूर झाली आहे. ३५० मि.मी. व्यासाची, २८ किलोमीटर लांबीची डी.आय.के.-९ जलवाहिनी विणल्या जाणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.