अकोट नगर परिषद विषय समिती व स्थायी समित्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे पुढील वर्षाकरिता विषय समित्यांवर सदस्य नामनिर्देशित करून सभापती निवड व स्थायी समिती गठन करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी अकोट नगर परिषदेची विशेष सभा गुरुवार, १४ जानेवारी रोजी न. प. सभागृह येथे बोलाविली होती. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे लाभले होते. या सभेमध्ये विविध पक्षांच्या तौलनिक बळानुसार विविध समित्यांवर गटनेत्यांमार्फत सदस्य नामनिर्देशित करण्यात आले. त्यानंतर सभापती पदाकरिता मुख्याधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी पार पडलेल्या सभेत सभापती पदाकरिता आलेल्या अर्जांची छाननी व त्यानंतर वैध अर्जांचे वाचन करण्यात आले. शिक्षण समिती सभापतीकरिता भारिप-बमसचे गटनेते मो. नुरुजम्मा मो. आदिल यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामध्ये बांधकाम - संगीता बोरोडे, शिक्षण - नासीहा आनिसोद्दीन, आरोग्य-गजानन लोणकर, पाणी पुरवठा- मंगेश चिखले, महिला व बालकल्याण -गंगा चंदन यांची सभापतीपदी, मंदा दिनेश घोडेस्वार यांची उपसभापतीपदी तर शशिकला गायगोले, कल्पना घावट व विवेक बोचे यांची स्थायी समिती सदस्यपदी अविरोध निवड करण्यात आली.
पीठासीन अधिकारी यांना मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, प्रशासकीय अधिकारी सागर पहुरकर, कनिष्ठ अभियंता करण अग्रवाल, स्वच्छता निरीक्षक चंदन चंडालिया, ग्रंथपाल संजय बेलुरकर, सभा लिपिक ऋषिकेश तायडे आदींनी सहकार्य केले. विषय समिती व स्थायी समितीची अविरोध निवड करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले.