अकोला - नवीन वर्षानिमित्त अकोला ते शेगाव या पायदळ पालखी सोहळ्यामध्ये सुमारे पाच ते सहा हजारांवर गजानन भक्तांचा सहभाग होता. श्रींच्या पायदळ पालखी मार्गावर विनोद मापारी मित्र मंडळांच्यावतीने चहा, नास्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय उत्तमपणे नियोजन केल्याने या दिंडीत अकोलेकरांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. तर पायदळ दिंडी सोहळ्यात नगरसेविका व नगरसेवकांनीही सहभाग घेतला.श्रीच्या पायदळ पालखी सोहळ्यामध्ये लहानग्यापासून ते जेष्ठांपर्यंत विविध वयोगटातील ५ ते ६ हजार भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याचे दिसून आले. आमदार गोवर्धन शर्मा व उद्योगपती नाना उजवणे यांच्या शुभहस्ते आरती करून वारीस प्रारंभ करण्यात आला. डाबकी रोड वासीयांतर्फे विनोद मापारी मित्र परिवाराचा सत्कार यावेळी करण्यात आला. विमानाने पालखीवर ५ ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली असून, महानगरपालिकेमधील बहुतांश नगरसेवक व नगरसेविकांनी सुद्धा संपूर्ण पायदळ वारी केली. या वारीमध्ये पंचक्रोशीतील २५ भजनी मंडळांचा सहभाग होता. अकोला ते शेगाव संपूर्ण रस्त्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. श्री संत गजानन महाराजांच्या भूमिकेतील दास कवी यांचे आकर्षण होते. डाबकी रोड येथे नाष्टा व चहा तर जोगलखेड फाटा येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. १५ छोट्या मोठ्या विश्राम वाहनांची सुविधा केली. तर अमरावती, वाशिम, बुलढाणा,यवतमाळ शहरातील सह अकोला जिल्ह्यातील अकोली खुर्द, खरप, भेंडीमहाल सारख्या विविध ग्रामीण भागातील वारकऱ्याांचा पायदळ वारीमध्ये समावेश होता. श्री क्षेत्र शेगाव संस्थान तर्फे सहभागी वारकऱ्यांना वस्त्र वाटप व सायंकाळच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमासाठी विनोद मापारी मीत्र मंडळाच्यावतीने परिश्रम घेण्यात आले.