बोरगाव मंजू (जि. बुलडाणा): अकोला महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी म्हैसांग शिवारात अवैध वाळूचे उत्खनन करताना एक पोकलॅन, एक ट्रॅक्टर व राष्ट्रीय महामार्गावरून वाळूची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर जप्त करून बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात आणून उभे केले. अकोलाचे तहसीलदार आर.डब्ल्यू. हांडे, मंडळ अधिकारी टी.डी. चव्हाण, तलाठी एम.डी. कांबळे, सतीश ढोरे, संतोष ठाकूर यांना माहिती मिळाल्यावरून ते म्हैसांग शिवारात पोहोचले असता, पूर्णा नदीच्या पात्रातून पोकलॅनच्या साह्याने वाळूचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी एम.एच. ३0 सी.व्ही. ६२४४ क्रमांकांचा ट्रॅक्टर व पोकलॅन जप्त करून बोरगावमंजू पोलीस ठाण्यात आणून उभे केले. याच सुमारास एम.एच. ३0 जे. २५७६ व एम.एच. ३0 जे. ४0७३ क्रमांकाची वाहने महामार्गावरून गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना आढळली. त्यामुळे तीदेखील जप्त करून पथकाने बोरगावमंजू पोलीस ठाण्यात आणून उभी केली. या प्रकरणी कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
विनापरवाना वाळू उत्खनन
By admin | Published: February 16, 2016 1:43 AM