लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापड बाजार परिसरात असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सोमवारी मध्यरात्री प्रवेश करून बँकेत चोरी करणार्या अट्टल चोरट्यास सिटी कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत मंगळवारी पहाटेच म्हणजेच तीन तासाच्या आत अटक केली. सदर चोरट्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस क ोठडी सुनावली.जुने शहरातील रहिवासी शेख कासम शेख कबीर याने सोमवारी रात्री उशिरा कापड बाजारातील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत प्रवेश केला. महाराष्ट्र बँकेच्या मुख्य द्वाराला खालच्या बाजूने सडलेले लाकूड असल्याने हे लाकूड तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेच्या सुरुवातीलाच असलेल्या एका ड्रावरमधील ५00 रुपयांची नोट चोरी केली. ही नोट घेतल्यानंतर त्याने स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मंगळवारी पहाटेपर्यंत त्याला स्ट्राँग रूमचा दरवाजा न उघडल्याने तो उजेड होण्याआधी बँकेतून पळून गेला. हा प्रकार सकाळीच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. बँकेत पंचनामा करून चोरट्याचा शोध सुरू केला. तीन तास होण्याच्या आधीच या चोरीतील अट्टल चोरटा शेख कासम शेख कबीर याला अटक केली. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नशेत तर्र असताना त्याने बँकेत चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे व कर्मचार्यांनी केली.
चोरट्याच्या नावावर ३५ घरफोड्याशेख कासम हा अट्टल चोरटा असून, त्याने आतापर्यंत तब्बल ३५ घरफोड्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. मंगळवारी पहाटेही तो चोरी करून पसार होणार होता; मात्र यथेच्छ मद्यप्राशन करून असल्याने तो पोलिसांच्या जाळय़ात अडकला. सदर चोरट्याकडून आणखी काही चोर्यांची माहिती मिळणार आहे.