अनंत वानखडे
बाळापूर: शहरातून हैद्राबाद-इंदौर महामार्ग गेला आहे. या महामार्गाचे नुकतेच सिमेंटीकरण व डांबरीकरण केले आहे. या ठिकाणी काही वाहनचालक बेशिस्तपणे दुतर्फा वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे, तसेच अपघाताची शक्यता वाढली आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनामार्फत बेशिस्त उभ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र पोलीस प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत असल्याने महामार्गावर बेशिस्त पार्किंग वाढल्याचे चित्र आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. शहरातील मिरवणूक मार्गावर अतिक्रमणधारकांनी वाहने उभे केली असल्याने जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराची वाढती लोकसंख्या व वाहनाची संख्या पाहता महामार्ग अतिक्रमण व बेशिस्त वाहन पार्किंगने अरुंद झाला आहे. हैद्राबाद-इंदौर या महामार्गचे मन नदी ते महेश नदीपर्यंतचे सिमेंटीकरण तर अकोला नाका ते खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापर्यत डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या मार्गावर बेशिस्त पार्किंग वाढली आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने याच मार्गावर उभे असतात. अशा वाहनांवर कारवाई होत नसल्याने अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन अशा वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.
----------------------
गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात शहरातील अवैध धंदे वाढले आहेत. गौण खनिज व गुरांची अवैध वाहतूक वाढली आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहने सुसाट धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.